विजेत्यांना १८ हजार ९५१ रुपयांची रोख बक्षिसे आणि आकर्षक चषक; १० नोव्हेंबर रोजी आयोजन
बेळगाव : खानापूर तालुक्यातील हलशीवाडी येथे दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून एक माणसाने बैलगाडा ओढण्याच्या जंगी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता ही स्पर्धा पार पडणार असून, स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसांसह चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २०० रुपये ठेवण्यात आले असून, प्रत्येक स्पर्धकाला आपले शारीरिक सामर्थ्य आणि कौशल्य दाखविण्यासाठी एक मिनिटाचा वेळ देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी स्पर्धा सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ५ हजार रुपयांचे बक्षीस वसुंधरा भास्करराव देसाई (कोल्हापूर) यांच्या स्मरणार्थ विष्णू रामचंद्र देसाई (उद्योजक, पुणे) यांच्याकडून देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी ४ हजार रुपये महेश्वर वसंत देसाई (उद्योजक, गोवा), तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये महेश (बाळू) गंगाराम जाधव (अध्यक्ष, लक्ष्मीदेवी यात्रा कमिटी), चतुर्थ क्रमांकासाठी २ हजार रुपये निवृत्त सुभेदार शंकर अमृत देसाई यांच्याकडून देण्यात येणार आहेत.
तसेच पाचव्या क्रमांकासाठी १ हजार ५०० रुपये अजित शंकर देसाई (उद्योजक, वडगाव), सहाव्या क्रमांकासाठी १ हजार रुपये महेश वामन देसाई (उद्योजक), सातव्या क्रमांकासाठी ७५० रुपये मयूर विष्णू गुरव (हलशी) आणि आठव्या क्रमांकासाठी ७०१ रुपये निंगाप्पा होसुर (अध्यक्ष, मानव हक्क) यांच्याकडून देण्यात येणार आहेत.
याशिवाय प्रकाश कडगावकर (हलगा), उद्योजक, नायजेरिया यांच्याकडून स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहेत.
या अनोख्या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन आपले सामर्थ्य दाखवावे, तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी मिलिंद देसाई (७७६०६८८७१०) किंवा शुभम देसाई (७०२६१७९०४१) यांच्याशी संपर्क साधावा.
