ओंकाराचे स्वरूप, सोन्याचा शोध आणि गुरुत्वाकर्षणावर आबासाहेब देसाई यांचे मार्गदर्शन; अभंग, भावगीते व कवितांनी रंगली मैफल
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रातर्फे सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. नीता देशपांडे डायबेटिस सेंटर येथे ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आबासाहेब देसाई उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर कार्यवाह सुरेंद्र देसाई आणि सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे आबासाहेब देसाई यांनी ओंकाराचे स्वरूप व त्याची निर्मिती, सोन्याच्या धातूचा शोध तसेच गुरुत्वाकर्षणाचा शोध या विषयांवर सविस्तर माहिती देत उपस्थितांना ज्ञानपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात अनंत सावंत यांनी प्रार्थना सादर केली. त्यानंतर स्वाती माने, अश्विनी पाटील, बाळकृष्ण बिर्जे, विजय वाईगडे, विजय बांदिवडेकर, सतीश देशपांडे, सुरेंद्र व योगिनी देसाई, राजेंद्र कर्नाटकी, आर. जी. कुंभोजकर, पी. एन. रायबागी, औदुंबर शेट्ये, प्रभाकर देसाई आणि विजय नाझरे यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते, अभंग आणि भावगीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. भरत गावडे यांनी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे स्वागत शिवराज पाटील यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सुरेंद्र देसाई यांनी करून दिला. ज्ञानवर्धक माहिती आणि सांगीतिक सादरीकरणामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कार्यक्रम आनंददायी व संस्मरणीय ठरला.
