रयत गल्लीत चारा गंजीला आग; शेतकरी कुटुंबाचे मोठे नुकसान

रयत गल्लीत चारा गंजीला आग; शेतकरी कुटुंबाचे मोठे नुकसान

दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांवर संकट; आगीत जनावरांसाठी साठवलेला चारा जळून खाक

बेळगाव : वडगाव येथील रयत गल्लीमध्ये भोमेश बिर्जे यांच्या घराच्या परसात जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या वाळलेल्या चाऱ्याच्या गंजीला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. रविवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दिवाळीच्या सणानिमित्त परिसरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह सुरू असताना फटाके आणि आकाशात सोडण्यात येणाऱ्या बाणांमुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. आकाशात सोडलेले बाण खाली येताना त्यातून पडलेली आगीची ठिणगी वाळलेल्या चाऱ्यावर पडल्यास क्षणार्धात आग भडकू शकते. त्यातूनच ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

आग लागल्याचे समजताच रयत गल्लीतील शेतकरी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, वाळलेल्या चाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने ती आटोक्यात आणणे कठीण झाले. अखेर अग्निशमन दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली.

आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे चारा टंचाईचा सामना करावा लागत असताना साठवून ठेवलेला चारा आगीत जळून गेल्याने भोमेश बिर्जे यांच्या शेतकरी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. दिवाळीच्या आनंदाच्या वातावरणात या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सणासुदीच्या काळात फटाके फोडताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन या घटनेच्या निमित्ताने करण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + eleven =

error: Content is protected !!