बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या दाव्याची आज (१६ सप्टेंबर) सुनावणी होण्याची शक्यता असून, सीमाभागातील मराठी जनतेचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागले आहे.
काही दिवसांपूर्वी अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांनी सुनावणी लवकर व्हावी यासाठी माननीय न्यायाधीशांच्या न्यायालयात दावा ‘मेंशन’ केला होता. त्यानंतर हा दावा ९ सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी बोर्डावर आला होता. मात्र, त्या दिवशी या प्रकरणावर प्रत्यक्ष सुनावणी होऊ शकली नव्हती.
त्यानंतर आजच्या १६ सप्टेंबरच्या सुनावणी यादीत पुन्हा एकदा या दाव्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आज या महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ८ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ज्येष्ठ विधिज्ञ गोपाळ सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने १४ सप्टेंबर रोजी त्यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर ब्रिफिंग घेतले.
या बैठकीला ज्येष्ठ वकील अपराजिता, शिवाजीराव जाधव, दिनेश ओऊळकर, राहुल प्रताप आणि संतोष काकडे उपस्थित होते. तसेच बेळगावहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वकील महेश बिरजे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे केंद्रीय अध्यक्ष प्रकाश मरगाळे सहभागी झाले होते.
आजच्या संभाव्य सुनावणीमुळे सीमा प्रश्नाच्या न्यायालयीन लढ्याला नवी दिशा मिळेल का, याकडे सीमाभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
