बेळगाव कॅन्टोन्मेंटमध्ये भव्य स्वच्छता अभियान; ७५० जणांचा उत्स्फूर्त सहभाग

बेळगाव कॅन्टोन्मेंटमध्ये भव्य स्वच्छता अभियान; ७५० जणांचा उत्स्फूर्त सहभाग

बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव

स्वच्छता दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव मिलिटरी स्टेशन आणि कॅन्टोन्मेंट परिसरात मंगळवारी भव्य स्टेशन-व्यापी स्वच्छता आंदोलन (Swachhata Andolan) राबविण्यात आले. या उपक्रमात सुमारे ७५० जणांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छ व हरित कॅन्टोन्मेंटच्या संकल्पनेला बळ दिले.

या अभियानात लष्करी अधिकारी व जवान, त्यांच्या कुटुंबीयांसह शाळकरी विद्यार्थी, नागरी कर्मचारी, कॅन्टोन्मेंटमधील स्थानिक रहिवासी आणि सफाई कर्मचारी सहभागी झाले. सुमारे १५ किलोमीटर रस्त्यांच्या परिसरात आणि ७५० एकर क्षेत्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

मिलिटरी हॉस्पिटल परिसर, विविध शाळा, द मराठा एलआयआरसी, जेएल विंग तसेच इतर लष्करी युनिट्स आणि आस्थापनांच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेदरम्यान सुमारे १०० किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. हा कचरा बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सहकार्याने तुर्मुरी ट्रेंचिंग ग्राऊंड येथे विल्हेवाट लावण्यात आला.

या उपक्रमात स्वच्छता कर्मचारी (सफाई कर्मचाऱ्यांचे) महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करण्यात आले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कॅन्टोन्मेंट परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्या योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले.

स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या आंदोलनातून देण्यात आला. आगामी २ ऑक्टोबर स्वच्छता दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव मिलिटरी स्टेशन आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचा स्वच्छ, हरित आणि जबाबदार कॅन्टोन्मेंट घडविण्याचा निर्धार या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाला.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × one =

error: Content is protected !!