बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतनच्या बालवाडी विभागात ‘अंकुर’ वर्गाची पालक कार्यशाळा ४ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बालशिक्षण तज्ज्ञ मारिया मॉन्टेसरी यांच्या जन्मदिनाचे आणि ताराबाई मोडक यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेची सुरुवात ‘आम्ही प्रकाश बीजे’ या प्रार्थनेने झाली. त्यानंतर पालकांच्या हस्ते मारिया मॉन्टेसरी आणि ताराबाई मोडक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश, गरज आणि उपयुक्तता स्पष्ट केली.
शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले यांनी ‘मूल अनुभवातून कसं शिकतं?’ या विषयावर मार्गदर्शन केले. शिक्षण संयोजिका नीला आपटे यांनी गाणे आणि खेळाच्या माध्यमातून मुलांशी पालकांनी कसे वागावे, तसेच मुलांच्या क्षमता ओळखून त्यांना प्रोत्साहन कसे द्यावे, हे समजावून सांगितले. बालवाडी शिक्षिका सुनिता पाटील यांनी मुलांच्या भावनिक विकासात पालक आणि शिक्षकांची भूमिका स्पष्ट केली.
कार्यशाळेचा अनुभवाधारित भाग विशेष आकर्षण ठरला. पालकांचे सहा गट करून त्यांना बालवाडीच्या सहा विषयांनुसार वर्गांमध्ये पाठवण्यात आले. इंद्रिय विकास, भाषिक विकास, गणिती विकास, परिचय पाठ, जीवन व्यवहार आणि कलानुभव या विषयांचे शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतीतून मार्गदर्शन केले. यावेळी पालक आणि शिक्षकांमध्ये विषयानुरूप समृद्ध संवाद झाला.
इंद्रिय विकासासाठी नयन परमोजी, भाषिक विकासासाठी अश्विनी हलगेकर व प्रतिभा चौथे, गणिती विकासासाठी श्रद्धा पावशे व सुनीता पाटील, परिचय पाठासाठी वरदा देसाई, जीवन व्यवहारासाठी भारती शिराळे आणि कलानुभवासाठी रेणू पवार यांनी मार्गदर्शन केले.
खेळ, कृतीयुक्त गाणी, अभ्यासक्रमाची ओळख आणि पालक-शिक्षक संवादावर कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.
या प्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, शिक्षण समन्वयक सविता पवार, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले आणि बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व बालवाडी शिक्षिका व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले. श्रद्धा पावशे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.
