इंचलमध्ये कामगारांना सापडला सोन्याच्या नाण्यांचा खजिना; 14 नाण्यांचे वजन 54.8 ग्रॅम

इंचलमध्ये कामगारांना सापडला सोन्याच्या नाण्यांचा खजिना; 14 नाण्यांचे वजन 54.8 ग्रॅम

बेळगाव : जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील इंचल गावात विबिजी रामजीच्या कामादरम्यान मजुरांना गाडग्यात 14 सोन्याची नाणी सापडल्याने खळबळ उडाली आहे. बीसीएम वसतिगृहाजवळ सुरू असलेल्या कामादरम्यान ही नाणी आढळून आली.

सापडलेल्या 14 नाण्यांचे एकूण वजन 54.8 ग्रॅम असून, त्यांची अंदाजे किंमत ₹8.27 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.

नाणी सापडल्यानंतर मजुरांनी ती स्वतःकडे न ठेवता तातडीने संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. पीडीओ व तालुका पंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही नाणी सवदत्ती तहसीलदार मल्लिकार्जुन हेग्गण्णवर यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांनी सर्व नाणी सरकारी तिजोरीत जमा केली.

नाण्यांवर हत्तीचे चिन्ह

या नाण्यांवर हत्तीचे चित्र असल्याचे समोर आले आहे. तलकाडच्या गंग राजघराण्याचे राजचिन्ह हत्ती असल्याने ही नाणी गंग राजवंशाच्या काळातील असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही नाणी इ.स. 10व्या ते 15व्या शतकादरम्यानची असू शकतात.

मात्र नाण्यांचा नेमका कालखंड, उगम आणि ऐतिहासिक महत्त्व अद्याप निश्चित झालेले नाही. पुरातत्त्व विभागाकडून तपासणी झाल्यानंतरच याबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे.

दरम्यान, लाखो रुपयांची किंमत असलेली नाणी सापडल्यानंतरही ती प्रामाणिकपणे प्रशासनाकडे जमा करणाऱ्या मजुरांचे सवदत्ती तालुका प्रशासनाने कौतुक केले आहे.

पुरातत्त्वीय तपासणीनंतर या नाण्यांचा खरा इतिहास आणि ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट होणार असून, इंचलमधील या शोधामुळे परिसराच्या प्राचीन इतिहासाबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + eight =

error: Content is protected !!