गणेशोत्सवापूर्वी बेळगावातील रस्ते खड्डेमुक्त करा; लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाची आयुक्तांकडे मागणी

गणेशोत्सवापूर्वी बेळगावातील रस्ते खड्डेमुक्त करा; लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाची आयुक्तांकडे मागणी

बेळगाव, दि. १ : गणेशोत्सवाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. गणेशमूर्तींचे आगमन, मिरवणुका आणि विसर्जन सोहळ्यादरम्यान नागरिक, भाविक व गणेशोत्सव मंडळांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाने महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांची स्थिती, मिरवणूक व विसर्जन मार्ग, विद्युत व्यवस्था, पथदिवे, स्वच्छता तसेच विसर्जन घाटांवरील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणीही महामंडळाने केली आहे.

पावसाळ्यात निर्माण झालेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करताना पारंपरिक पद्धतींसह प्री-कास्ट आणि जिओ-पॉलिमर टेक्नो-पॅचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना देण्यात यावेत. शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्ते आणि गणेश विसर्जन मार्गावरील खड्ड्यांना प्राधान्य देऊन तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असून केवळ आदेश काढून न थांबता महानगरपालिका प्रशासनाने प्रत्यक्ष रस्त्यांवर उतरून कामांची पाहणी करावी, अशी अपेक्षा महामंडळाने व्यक्त केली आहे. मिरवणूक व विसर्जन मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून ते पूर्णपणे खड्डेमुक्त करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, तसेच विसर्जन घाटांवरील आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी व पथके नियुक्त करून २४ तास कार्यरत यंत्रणा सज्ज ठेवावी. खड्डे बुजवण्यापूर्वी आणि त्यानंतरची छायाचित्रे प्रसिद्ध करून कामकाजात पारदर्शकता ठेवावी, अशी सूचनाही महामंडळाने केली आहे.

गणेश मिरवणूक मार्गांवरील विद्युत तारांची विशेष तपासणी करून त्या सुरक्षित उंचीवर असल्याची खात्री करावी. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

महानगरपालिकेच्या अखत्यारीबाहेरील रस्त्यांवरील खड्ड्यांचाही प्रश्न तातडीने सोडवावा. सार्वजनिक बांधकाम विभाग, विकास प्राधिकरणे आणि इतर शासकीय यंत्रणांनी समन्वय साधून आपल्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरुस्ती करावी. तसेच गणेशोत्सव काळात मिरवणूक मार्गांवर नवीन खड्डे किंवा चर खोदण्यास कोणत्याही यंत्रणेला परवानगी देऊ नये आणि मंडळांना आवश्यक परवानग्या जलदगतीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, हेमंत हावळ, सुनील जाधव, अर्जुन राजपूत, गजानन हांगीरगेकर, रवी कलघटगी यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − seven =

error: Content is protected !!