मराठी शिक्षक भरतीसाठी लढणाऱ्या योद्ध्यांचा युवा समिती सीमाभागतर्फे सन्मान

मराठी शिक्षक भरतीसाठी लढणाऱ्या योद्ध्यांचा युवा समिती सीमाभागतर्फे सन्मान

बेळगाव : कर्नाटक सरकारच्या प्राथमिक शाळांमधील १५ हजार शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी व उर्दू माध्यमातील उमेदवारांना स्थान न दिल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या अन्यायाविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांनी तातडीने आवाज उठवत संबंधित प्रशासनाकडे निवेदनाद्वारे निषेध नोंदविला होता.

मराठी शिक्षक भरतीच्या मागणीसाठी सीमाभागातून व्यापक जनआंदोलन उभे राहिले. मराठी उमेदवारांच्या न्याय्य हक्कांसाठी खानापूरचे गणपती बावकर आणि मोहन पाटील यांनी बेंगळुरू येथे तब्बल आठ ते दहा दिवस ठाण मांडून लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. तसेच हा प्रश्न विधानसभेत मांडला जावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

शिक्षक भरती प्रक्रियेत केवळ कन्नड माध्यमातील शाळांसाठी पदे जाहीर करण्यात आली होती. मराठी व उर्दू माध्यमातील शाळांमधील रिक्त पदांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची बाब महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर मराठीसह सर्व अल्पसंख्याक माध्यमातील शाळांसाठी तातडीने शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

या सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर यश मिळाले असून कर्नाटक सरकारने मराठी माध्यमासाठी २०० शिक्षक पदांना मान्यता दिली आहे. मराठी शिक्षक भरतीचा प्रश्न निर्णायक टप्प्यापर्यंत नेण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे गणपती बावकर आणि मोहन पाटील यांचा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागतर्फे विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे आणि चिटणीस अभिजित मजुकर उपस्थित होते.

युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, हा सन्मान केवळ दोन कार्यकर्त्यांचा नसून मराठी भाषा, मराठी शिक्षण आणि सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक मराठी योद्ध्याच्या संघर्षाचा गौरव आहे. मराठी भाषिकांच्या हक्कांसाठीचा लढा यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 🚩

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − seven =

error: Content is protected !!