बेळगाव, १९ ऑगस्ट : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे बेळगाव जिल्ह्यातील मराठी दांपत्याची झालेली निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, तसेच फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बेळगावात शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावातील मराठी समुदाय आणि मराठा समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार असून, यासंदर्भात बुधवारी बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरासे (IPS) यांना परवानगीसाठी निवेदन देण्यात आले.
मूळचे बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रहिवासी असलेले मोहन नागप्पा केसरेकर (वय ४५) आणि त्यांच्या पत्नी निशा मोहन केसरेकर (वय ३५) हे कामानिमित्त सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील विघ्नहर्ता शांती कॉलनी, एमआयडीसी परिसरात राहत होते. आरोपी फरिद अब्दुल शेख (वय ५०) याने धारदार शस्त्राने वार करून या दांपत्याची हत्या केल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे बेळगावसह सीमाभागात संतापाची लाट निर्माण झाली असून, आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
असा असेल मूक मोर्चाचा मार्ग
- दिनांक : शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६
- वेळ : सकाळी ११ वाजता
- प्रारंभ : सरदार हायस्कूल मैदान, बेळगाव
- समापन : जिल्हाधिकारी कार्यालय, बेळगाव
सरदार हायस्कूल मैदानावरून मोर्चाला सुरुवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.
हा मोर्चा पूर्णपणे शांततेत, कायदेशीर आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात येणार असून, वाहतूक तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आयोजकांनी दिली आहे.
पोलीस आयुक्तांना निवेदन देताना रमाकांत कोंडुसकर, हरी शानबाग, सागर पाटील, कपिल भोसले, प्राचार्य आनंद आपटेकर, संदीप कामुले, राजेंद्र बैलूर, सातेरी नाईक, शुभम पाटील, नंदू इंदलकर यांच्यासह मराठा समाज आणि मराठी समुदायातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
