बेळगाव, ता. १६ :
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने कारवार जिल्ह्यातील रामनगर येथे तब्बल ४०० रोपांची लागवड करण्यात आली. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देणारा हा उपक्रम रामनगर येथील गायत्री रिसॉर्ट परिसरात पार पडला. कार्यक्रमाला भाजप व सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
वाढते तापमान, घटणारे पावसाचे प्रमाण आणि कमी होत चाललेले वनक्षेत्र लक्षात घेऊन यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय जायंट्स मेनने घेतला. त्यानुसार रामनगर येथील गायत्री रिसॉर्ट परिसरातील सुमारे दोन किलोमीटरच्या परिसरात दहा ठिकाणी ४०० रोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे किरण जाधव यांनी जायंट्स ग्रुपच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले. केवळ रोपे लावणेच नव्हे, तर त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचे नियोजनही संस्थेने केले आहे, ही बाब प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जायंट्स ग्रुप समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबवत असून भविष्यातही असे उपक्रम सुरू ठेवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
जायंट्सचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी सांगितले की, पावसाळ्यात वनक्षेत्र वाढीसाठी काहीतरी वेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय संस्थेच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार रामनगर परिसरात सीड बॉल विखुरणे आणि वृक्षारोपण असे दोन पर्यावरणपूरक उपक्रम एकाचवेळी राबविण्यात आले. या दोन्ही उपक्रमांसाठी किरण जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपाध्यक्ष अरुण काळे, मधु बेळगावकर, सचिव विश्वास पवार, फेडरेशन ऑफिसर सुनील मुतगेकर, को-ऑर्डिनेटर अशोक हलगेकर, माजी अध्यक्ष शिवराज पाटील, मदन बामणे, उमेश पाटील, सुनील भोसले यांच्यासह जायंट्सचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
