बेळगाव, ता. १६ :
‘झाडे वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने कारवार जिल्ह्यातील रामनगर येथे आगळावेगळा सीड बॉल उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत अंबा, जांभूळ, सुबाभूळ आणि इतर उंच वाढणाऱ्या जंगली वृक्षांच्या ३०० हून अधिक सीड बॉल्स जंगल परिसरात विखुरण्यात आले. या उपक्रमात जायंट्सचे सुमारे ४० हून अधिक सदस्य सहभागी झाले.
जायंट्सच्या मासिक बैठकीसोबतच वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा हा संयुक्त उपक्रम रामनगर–जोयडा रोडवरील गायत्री रिसॉर्ट परिसरातील जंगलात पार पडला. जंगल क्षेत्राची वाढ व्हावी आणि नैसर्गिक पद्धतीने अधिक वृक्ष उगवावेत, या उद्देशाने सीड बॉल्स जंगलात फेकण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजप व सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी जायंट्स ग्रुपने गेल्या सहा महिन्यांत समाजोपयोगी ४२ हून अधिक उपक्रम यशस्वीपणे राबविल्याचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित केलेला सीड बॉल उपक्रम अभिनव असून भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांतून समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी सांगितले की, संस्थेने गेल्या सहा महिन्यांत अंमली पदार्थांविरोधातील जनजागृती रॅली, गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, डॉक्टरांचा सत्कार यासह विविध ४२ समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. त्याच मालिकेतील पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून सीड बॉल अभियान हाती घेण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष अरुण काळे, मधु बेळगावकर, सचिव विश्वास पवार, फेडरेशन ऑफिसर सुनील मुतगेकर, को-ऑर्डिनेटर अशोक हलगेकर, माजी अध्यक्ष शिवराज पाटील, मदन बामणे, उमेश पाटील, सुनील भोसले यांच्यासह जायंट्सचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास पवार यांनी केले, तर मधु बेळगावकर यांनी आभार मानले.
