सरकारी मराठी शाळेला कायमस्वरूपी मुख्याध्यापक द्या; SDMC चे गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

सरकारी मराठी शाळेला कायमस्वरूपी मुख्याध्यापक द्या; SDMC चे गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

मच्छे येथील शाळेतील प्रलंबित अडचणी तातडीने सोडविण्याची मागणी; शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणीचे आश्वासन

मच्छे (प्रतिनिधी) : सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील शाळा विकास व व्यवस्थापन समिती (SDMC) सदस्यांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला भेट देऊन शाळेसाठी कायमस्वरूपी मुख्याध्यापक नियुक्त करण्याची तसेच शाळेतील विविध प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. यासंदर्भातील निवेदन गट शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

निवेदनामध्ये शाळेतील दिवसेंदिवस वाढणारी विद्यार्थीसंख्या, नव्याने सुरू करण्यात आलेले LKG व UKG वर्ग, तसेच शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजावर होत असलेला परिणाम याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. कायमस्वरूपी मुख्याध्यापक नसल्याने शाळेच्या दैनंदिन कारभारावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

निवेदन स्वीकारल्यानंतर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी येत्या शुक्रवारी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यात येईल. सर्व समस्या समजून घेऊन त्यावर योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन SDMC सदस्यांना दिले.

यावेळी SDMC अध्यक्ष, समिती सदस्य तसेच पालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × four =

error: Content is protected !!