कपिलेश्वर उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांची मागणी; पोलिस आयुक्तांकडून लवकरच पाहणी

कपिलेश्वर उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांची मागणी; पोलिस आयुक्तांकडून लवकरच पाहणी

बेळगाव : श्री कपिलेश्वर उड्डाणपूल (ROB) परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची वर्दळ आणि शनी मंदिर चौकातील वाहतुकीचा विस्कळीतपणा याबाबत सामाजिक कार्यकर्ते विकास कलघटगी यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली.

सकाळ व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत कपिलेश्वर उड्डाणपुलावरून दोन्ही बाजूंनी अवजड मालवाहू वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. अवजड वाहनांमुळे शहीद भगतसिंग चौक (शनी मंदिर सर्कल) येथे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

तसेच उड्डाणपुलावर वाहतुकीत शिस्त राखण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वायर रोप डिव्हायडर उभारणे, शनी मंदिर परिसरातील अतिक्रमणे व अनावश्यक वस्तू हटविणे, भाविकांना मंदिराच्या तिन्ही प्रवेशद्वारातून सुलभ दर्शनाची व्यवस्था करणे आणि कायमस्वरूपी ऑटो रिक्षा स्टँड उभारण्याची मागणीही करण्यात आली.

याशिवाय शनिवार आणि धार्मिक उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने मंदिराशेजारील मोकळ्या जागेत तात्पुरती वाहतूक पोलिस चौकी सुरू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त लवकरच या भागाची प्रत्यक्ष पाहणी करणार असून वाहतुकीतील लेन शिस्तीबाबत प्रायोगिक तत्त्वावर उपाययोजना राबविण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बेधडक बेळगावने यापूर्वीच कपिलेश्वर उड्डाणपूल परिसरातील वाहतूक समस्यांबाबत आवाज उठवत नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवल्या होत्या. आता या प्रश्नावर प्रशासन सकारात्मक पावले उचलणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen − seven =

error: Content is protected !!