बेळगाव : प्रतिनिधी
बेळगावच्या धनश्री बडसकर हिने नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या वर्ल्ड कप पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२६ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शानदार कामगिरी करत ज्युनियर महिला ४८ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला. तिच्या या यशामुळे भारतासह कर्नाटक आणि बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
९ आणि १० ऑक्टोबर २०२६ रोजी काठमांडू येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. WRPF Global Powerlifting Alliance (GPA) आणि United Powerlifting Association (UPA) यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत धनश्रीने आपल्या ताकदीचे आणि कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
धनश्रीने स्क्वॅट प्रकारात ८० किलो, बेंच प्रेसमध्ये ४५ किलो आणि डेडलिफ्टमध्ये ११० किलो वजन उचलले. अशा प्रकारे तिने एकूण २३५ किलो वजन उचलत आपल्या गटात प्रथम स्थान मिळविले आणि विजेतेपदावर नाव कोरले.
धनश्री बडसकर ही आर. के. ट्युशन क्लासेसची माजी विद्यार्थिनी आहे. तिच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल संस्थेकडून अभिमान व्यक्त करण्यात आला. तिच्या मेहनतीला आणि जिद्दीला मिळालेल्या या यशामुळे संस्थेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर बेळगावचे नाव उज्ज्वल करणाऱ्या धनश्रीचे सर्वत्र अभिनंदन होत असून, तिच्या यशामुळे नवोदित खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार आहे. भविष्यातही धनश्रीने पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
