बेळगाव : प्रतिनिधी
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली टिळकवाडी येथील सावरकर रोडवरील बी.पी. पॅसेज परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून असलेला कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वच्छ आणि सुंदर टिळकवाडीच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
या उपक्रमावेळी महानगरपालिकेचे कर्मचारी, सॅनिटरी इन्स्पेक्टर तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. परिसरातील अस्वच्छता दूर करून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या समस्येला आळा घालण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, नागरिकांनी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या कचरा संकलन वाहनातच कचरा द्यावा, जेणेकरून परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहण्यास मदत होईल.
संबंधित ठिकाणी पुन्हा कचरा टाकल्यास नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
‘स्वच्छ टिळकवाडी, सुंदर टिळकवाडी!’ हा संकल्प पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. स्वच्छता ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
