निपाणी : आगामी निपाणी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय बैठक घ्यावी, असे कळकळीचे आवाहन फोर जेआर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनतर्फे करण्यात आले आहे.
संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निपाणी नगरपालिकेच्या इतिहासात आजपर्यंत निवडणुका शांततापूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकीत 31 प्रभागांसाठी सुमारे 200 हून अधिक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरणार असून, प्रत्येक उमेदवार निपाणीच्या विकासाचा ध्यास घेऊन निवडणूक लढवत आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सर्व राष्ट्रीय, राज्य व अपक्ष इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करावी व सामायिक विकास जाहीरनामा तयार करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या बैठकीत जवाहर तलाव पुनरुज्जीवन, शहर व उपनगरातील रस्ते, स्ट्रीट लाईट, गटारी व नाल्यांची दुरुस्ती, अतिक्रमण हटाव मोहीम, शहराचा सुधारित मास्टर प्लॅन, निपाणीच्या प्रवेशद्वारांचे सुशोभीकरण, दत्त खुले नाट्यगृह परिसरातील प्रश्न, गांधी हॉस्पिटलमध्ये तालुका पातळीवरील सुविधा उपलब्ध करणे तसेच शहरातील एकमेव ट्राफिक सिग्नल सुरू करणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व्हावी, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
निवडणूक ही वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांची न राहता “विकासाची मैत्रीपूर्ण लढत” व्हावी आणि जो कोणी निवडून येईल त्याने नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
ही मागणी फोर जेआर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन (CIN: U85300KA2022NPL164010) तर्फे करण्यात आली आहे.
