बेळगाव : साहित्य विकास मंडळ, कारदगा यांच्या विद्यमाने २९ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. कारदगा येथील डी. एस. नाडगौडा कॉलेजच्या प्रांगणात सकाळी ८ ते रात्री ८.३० या वेळेत हे संमेलन पार पडणार आहे.
संमेलनाची सुरुवात सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने होणार असून, ज्योतिर्लिंग मंदिरापासून संमेलनस्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत उद्घाटन सत्र होईल. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड उपस्थित राहणार आहेत. समाजसेवक डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी गणपतराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, उस्मानगणी पटेल यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन, रतन मेळवणकी यांच्या हस्ते साहित्यनगरीचे उद्घाटन आणि प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते व्यासपीठाचे उद्घाटन होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून बाळासाहेब नाडगौडा उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत संमेलनाध्यक्षांचे भाषण होईल. त्यानंतर दुपारी २ ते ४ या वेळेत प्रसिद्ध लेखक व उद्योजक शरद तांदळे, पुणे यांची मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. महेश घोटणे, कुरुंदवाड हे मुलाखतकार म्हणून काम पाहणार आहेत.
दुपारी ४ ते ६.३० या वेळेत ‘जगभर कवितेच्या सन्मान मराठीचा’ या संकल्पनेवर आधारित कवी संमेलन होणार आहे. यामध्ये डॉ. स्वप्नील चौधरी, पुणे, कवयित्री गुंजन पाटील, संभाजीनगर आणि श्री. नाईकवाडे गिहे, बेळगाव सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत संतोष महाराज पुजारी, कडवेकर व सहकलाकार, सातारा यांचा विनोदी एकपात्री ‘भांड’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
संमेलनाच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. डॉ. विनोद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. डॉ. अच्युत माने, निपाणी यांच्या ‘स्नेहबंध’ आणि प्रा. डॉ. संभाजी कुरलीकर, कुरली यांच्या ‘तुझ्याविना जगताना’ या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे आणि प्रा. चंद्रकुमार नलगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
या संमेलनाला लोकप्रतिनिधी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि साहित्यप्रेमी उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या यशस्वितेसाठी साहित्य विकास मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या साहित्य संमेलनाला साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
