कारच्या पैशाच्या वादातून युवकाचा खून; बेळगाव ग्रामीण पोलिसांकडून 5 आरोपी अटकेत

कारच्या पैशाच्या वादातून युवकाचा खून; बेळगाव ग्रामीण पोलिसांकडून 5 आरोपी अटकेत

बेळगाव : कार खरेदी-विक्रीच्या पैशाच्या वादातून एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत 5 आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी सूरज सिद्धगौळी यांच्यात जुन्या कारच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. दोन लाख रुपयांना ठरलेल्या कारसाठी एक लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते. मात्र कारमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने ती परत करण्यात आली. त्यानंतर वापरलेल्या कारच्या बदल्यात 30 हजार रुपये वजा करून उर्वरित 70 हजार रुपये परत देण्याची मागणी करण्यात आली होती. यातील केवळ 20 हजार रुपये परत करण्यात आले होते, तर 50 हजार रुपये बाकी होते.

दि. 27 मे रोजी हुंचानहट्टी गावातील रामेश्वर नगर परिसरात फिर्यादी, मृत राहुल तिप्पण्णा तळवार आणि त्यांचे मित्र पार्टीसाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी एकत्र येऊन कारच्या पैशाच्या वादातून राहुल याला बोलावून घेतले. चर्चा सुरू असताना आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. डोक्यावर, पाठीवर व हातावर गंभीर वार केल्याने राहुलचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत खालील आरोपींना अटक केली आहे :

  • सूरज रामू सिद्धगौळी (26)
  • योगेश बाबू दोडमनी (28)
  • मंजुनाथ सुरेश मळकूर (21)
  • देमाप्पा तळवार (26)
  • एका अल्पवयीन मुलाचा समावेश

इतर आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.

या गुन्ह्याचा जलद तपास करून आरोपींना अटक करणाऱ्या पोलीस पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + 3 =

error: Content is protected !!