बेळगाव : शहरातील विजयनगर परिसरात काही दिवसांपासून महिलांना त्रास देणाऱ्या एका युवकाला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक विजयनगर भागातील काही दुकानांमध्ये महिला एकट्या असल्याचे पाहून जात असे. दुकानात गेल्यानंतर तो मुद्दाम आपल्या मोबाईलमध्ये अश्लील चित्रफिती सुरू करून विविध कारणांनी मोबाईल काउंटरवर ठेवत असल्याचा आरोप आहे. हा प्रकार वारंवार घडत असल्याने महिला दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, एका महिला दुकानदाराने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून दिला. आज पुन्हा संबंधित युवकाने त्याच प्रकारे दुकानात येऊन अश्लील चित्रफित दाखवण्याचा प्रयत्न केल्यानंतर स्थानिकांनी त्याला पकडले. संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी युवकाला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे. परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
