बेळगांव : हिंडलगा गावचे सुपुत्र, महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ खेळाडू श्री. फकीरा व्यंकटेश देवगेकर यांचे सोमवार दिनांक 18 रोजी सकाळी 10.15 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते सीमा भागातील प्रसिद्ध शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांचे वडील होत.
खो-खो, कबड्डी, धावणे, बैठका आणि दंड मारणे या क्रीडा प्रकारांमध्ये बेळगाव जिल्ह्यात सातत्याने प्रथम क्रमांक पटकावणारे फकीरा देवगेकर हे हिंडलगा गावच्या प्राथमिक मराठी शाळेचे आवडते खेळाडू म्हणून ओळखले जात होते. गावात विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात त्यांचे मोठे नेतृत्व असायचे.
गावातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी कोणतेही मानधन न घेता खो-खो व कबड्डीचे प्रशिक्षण देऊन अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर राहिले. त्यांच्या प्रामाणिक, मनमिळावू आणि निस्वार्थ स्वभावामुळे त्यांना “अजातशत्रू” म्हणूनही ओळखले जात होते.
दिवंगत आमदार बी. आय. पाटील यांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी उत्साहाने प्रचारकार्य केले होते. तसेच दिवंगत रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानेही त्यांचा उल्लेख केला जात होता.
त्यांच्या निधनामुळे हिंडलगा गावात हळहळ व्यक्त होत असून क्रीडा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक जिव्हाळ्याचा व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक 21 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
