सीमाप्रश्नी उदयनराजे भोसले यांचा पुढाकार; सीमावासीयांवरील अन्यायाबाबत अमित शहा यांना पत्र लिहिणार

सीमाप्रश्नी उदयनराजे भोसले यांचा पुढाकार; सीमावासीयांवरील अन्यायाबाबत अमित शहा यांना पत्र लिहिणार

बेळगाव, दि. २८ : सीमाप्रश्नाला गती मिळावी तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या कथित अन्याय, भाषिक अत्याचार आणि कन्नड सक्तीच्या विरोधात केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, या मागणीसाठी पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर केले.

खानापूर व बेळगाव परिसरातून नोकरी व व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या युवक आणि नागरिकांनी ‘पुणे महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या माध्यमातून सीमावासीयांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा आणि केंद्र व महाराष्ट्र सरकारकडे न्याय मागण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नी खटल्याला गती मिळावी यासाठी सुरू असलेल्या सही मोहिमेलाही त्यांनी पाठिंबा व्यक्त केला.

निवेदनात सीमाभागातील मराठी भाषिकांवरील कथित अन्याय, मराठी भाषेची गळचेपी, कन्नड सक्ती तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची दखल केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी सीमाप्रश्नी आपण संवेदनशील असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तात्काळ पत्र लिहून सीमावासीयांवरील अन्यायाची माहिती देणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या विषयात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही महाराष्ट्र विधानसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात सीमाप्रश्न उपस्थित करून त्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष हेमंत हिंदुराव शिंदे, गणपती पाटील, सातेरी पाटील, विश्वनाथ पाखरे, वैराळ सुळकर, गंगाराम वीर, परशुराम पाखरे, राजकीरण गाडेकर, प्रशांत बावकर, युवराज रोखडे यांच्यासह पुणे महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × four =

error: Content is protected !!