बेळगाव : देवराज उर्स कॉलनी परिसरातील तलावात आज दुपारी दुर्दैवी घटना घडली असून, पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. तलावाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने युवक खोल पाण्यात गेल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू ग्रुपचे सदस्य अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, विकी मेहता आणि मायकेल पिंटो यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कोणतीही वेळ न दवडता त्यांनी तलावात उतरून शोधमोहीम सुरू केली आणि अल्पावधीतच युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले.
त्यानंतर मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. या दु:खद प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेले धाडस, तत्परता आणि सेवाभाव याबद्दल परिसरातील नागरिक आणि उपस्थितांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
