बेळगाव (प्रतिनिधी) : महात्मा फुले यांचे कार्य केवळ दलित, विधवा, शिक्षण आणि शेतकरी यापुरते मर्यादित नसून त्यांनी कामगार चळवळीतही मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांनी केले.
प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आयोजित संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. शुक्रवारी सायंकाळी रामदेव गल्ली येथील शहीद भगतसिंग सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड नागेश सातेरी होते, तर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी महात्मा फुले यांच्या कामगार चळवळीतील योगदानावर प्रकाश टाकताना प्रा. मेणसे म्हणाले की, जेम्स वॅट यांनी वाफेचा शोध लावल्यानंतर जगात औद्योगिक क्रांती घडून आली आणि यंत्रयुगाची सुरुवात झाली. व्यापारी उद्योजक बनले आणि उद्योगांसाठी कामगारांची गरज वाढली. मात्र, कामगारांच्या श्रमावर उद्योजकांनी प्रचंड संपत्ती कमावली, तर कामगार मूलभूत सुविधांपासूनही वंचित राहिले.
1860 ते 1890 या काळात दुष्काळामुळे ग्रामीण भागातील लोक कामाच्या शोधात मुंबईत आले. 1854 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू झाली, तर 1875 मध्ये गिरणी कामगारांनी ‘मिल कॉर्नर असोसिएशन’ स्थापन केली. त्या काळात कामगारांसाठी कोणतेही कायदे, सुविधा किंवा साप्ताहिक सुट्टी नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.
महात्मा फुले यांचे अनुयायी नारायण लोखंडे यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. फुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कामगार चळवळीला बळ दिले. पत्रकार भालेकर यांनी ‘दीनबंधू’ या वर्तमानपत्रातून कामगारांच्या समस्या मांडल्या, तर इतिहासकार कृष्णराव केळुस्कर यांनीही या चळवळीत सहभाग घेतला
कामगारांच्या हितासाठी पगार वेळेवर मिळावा, महिलांसाठी प्रसाधनगृहे असावीत, आठवड्यातून एक दिवस सुट्टी, जखमी कामगारांना मदत, काम करताना मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य, पेन्शन अशा विविध मागण्या पुढे आल्या. या मागण्यांसाठी कामगारांनी तब्बल दहा वर्ष संघर्ष केला. मुंबईतील 73 गिरण्यांमध्ये कामगारांमध्ये जनजागृती करण्यात आली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे मेळावे, सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून कामगारांमध्ये एकजूट निर्माण करण्यात आली.
या चळवळीला जातीय रंग देण्याचेही प्रयत्न झाले. दंगलींमध्ये कामगारांचे बळी गेले आणि फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. मात्र, संघटित चळवळीच्या जोरावर कामगार पुन्हा एकत्र आले आणि गिरणी मालकांना संपाचा इशारा दिला. अखेर कामगारांच्या मागण्या मान्य करत आठवड्याची सुट्टी देण्यास मालकांना भाग पाडले गेले.
कामगार चळवळीने केवळ कामगारांचे हितच जपले नाही, तर समाजहिताचाही विचार केला. या चळवळीत कधीही वैयक्तिक स्वार्थाला स्थान दिले गेले नाही, असेही प्रा. मेणसे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिवंगत नेते टी. के. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कृष्णा शहापूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर आजगावकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
