बेळगाव, दि. १५ : कन्नड सक्तीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले होते.
बैठकीच्या प्रारंभी तालुक्यातील दिवंगत समिती नेते व कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांनी बैठकीचे प्रयोजन स्पष्ट करत कन्नड सक्तीविरोधातील लढा अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले.
२२ जून रोजी होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मराठी भाषा, संस्कृती आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी हा मोर्चा महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मोर्चात तालुक्यातील प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी व्हावेत यासाठी विशेष नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी शिवाजी खांडेकर यांनी बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत खंत व्यक्त केली. समितीकडून जबाबदारी आणि पदे देण्यात आलेले अनेक पदाधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याचे त्यांनी नमूद केले. तर नारायण सांगावकर यांनी निवडणुकांच्या काळात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होतात, मात्र चळवळीच्या आणि लढ्याच्या वेळी उपस्थिती कमी दिसते, ही खेदाची बाब असल्याचे सांगितले.
बैठकीत विभागनिहाय बैठका घेणे, गावोगावी जाऊन परिपत्रकांचे वितरण करणे, प्रत्येक गावात जनजागृती मोहीम राबविणे आणि प्रत्येक घरातून जास्तीत जास्त लोकांनी २२ जूनच्या मोर्चात सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर होणारा मोर्चा ऐतिहासिक आणि यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी मनोहर हुंदरे, आर. के. पाटील, अनिल पाटील, लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र मोदगेकर, पियुष हावळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. सीमाप्रश्न आणि मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्यात प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बैठकीला तालुक्यातील विविध गावांतील समिती पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी २२ जूनच्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
