खानापूरच्या पाणीहक्काबाबत लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करावी; सुरेश जाधव यांची मागणी

खानापूरच्या पाणीहक्काबाबत लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करावी; सुरेश जाधव यांची मागणी

खानापूर, प्रतिनिधी : मलप्रभा नदीवरील विविध पाणी उपसा व वळवण योजनांमुळे भविष्यात खानापूर तालुक्याच्या पाणीहक्कावर परिणाम होण्याची शक्यता असून, या गंभीर प्रश्नावर तालुक्याचे आमदार, खासदार आणि स्थानिक नेतृत्वाने तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव यांनी केली आहे.

सुरेश जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालुक्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मलप्रभा नदीतून विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा करण्याची कामे सुरू आहेत. पारिश्वाड येथील Siddanbhavi TFS योजनेतून सुमारे 28.40 MCFT तर कुसमळी (जांबोटी) येथील Santobastwad TFS योजनेतून 30 MCFT पाणी उचलण्याची योजना असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

याशिवाय Kalasa Diversion Scheme (1.72 TMC) आणि Bhandura Nala Diversion Scheme (2.18 TMC) या योजनांचाही उल्लेख करत, संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी भविष्यात या योजना कार्यान्वित झाल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम खानापूर तालुक्यावर होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

खानापूर तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो, तर शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत तालुक्याच्या हक्काच्या नदीतील पाणी इतरत्र वळवले जात असताना लोकप्रतिनिधी शांत का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“पावसाळ्यात केवळ दोन-तीन महिनेच पाणी उपसा केला जाईल, असे सांगितले जात असले तरी एकदा पंपिंग स्टेशन, पाइपलाइन आणि आवश्यक यंत्रणा उभी राहिल्यानंतर भविष्यात पाण्याचा उपसा मर्यादित कालावधीपुरताच राहील, याची हमी कोण देणार?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

खानापूरच्या हक्काच्या पाण्याचे संरक्षण कोण करणार, तालुक्याच्या भविष्यासाठी कोण उभे राहणार, लोकप्रतिनिधी गप्प का आहेत आणि स्थानिक नेतृत्वाची नेमकी भूमिका काय आहे, याची स्पष्ट उत्तरे जनतेला मिळावीत, अशी मागणी त्यांनी केली.

हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून संपूर्ण खानापूर तालुक्याच्या अस्तित्वाचा असल्याचे सांगत, या गंभीर विषयावर अनेक स्थानिक नेते, भाजप पदाधिकारी तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीशी संबंधित काही नेत्यांकडूनही अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

पाण्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून खानापूरच्या हितासाठी एकत्र यावे आणि जनतेनेही आपल्या हक्काच्या पाण्यासाठी जागरूक राहून एकजूट दाखवावी, असे आवाहन सुरेश जाधव यांनी केले.

(टीप : वरील दावे व आरोप हे सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातील असून, याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका प्राप्त झालेली नाही. ती प्राप्त झाल्यास प्रसिद्ध करण्यात येईल.)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × one =

error: Content is protected !!