बेळगाव : ८०व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बायकिंग ब्रदरहूड बेळगावच्या वतीने हेम्माडगा मराठी प्राथमिक शाळेला भेट देत विद्यार्थ्यांसोबत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि आवश्यक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
या उपक्रमांतर्गत शाळेच्या मूलभूत गरजांसाठी मदत करण्यात आली. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय साहित्याचे किट, स्पोर्ट्स अॅक्सेसरीज आणि फर्स्ट एड किट वितरित करण्यात आले. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
या सामाजिक उपक्रमासाठी बायकिंग ब्रदरहूड बेळगावच्या सदस्यांनी एकजुटीने पुढाकार घेतला. मुख्य संयोजक (कोअर टीम) सिद्धांत पाटील, प्रविण कुलकर्णी, महेश हसबे, समीर शिगळी आणि अमित रावूत यांनी उपक्रमासाठी १०० टक्के योगदान दिले.
या उपक्रमात नंदिनी, श्रीदत्त, शिवराज, झेवीअर आणि सिदराज यांच्यासह विविध रायडर्स सहभागी झाले. तसेच स्थानिक सहकार्याबद्दल शितोळे सर आणि भगवान देसाई यांचे विशेष आभार मानण्यात आले.
विद्यार्थ्यांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा करताना सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
“रस्ता फक्त प्रवासासाठी नाही, तर समाजासाठीही असतो!” या संदेशातून बायकिंग ब्रदरहूड बेळगावने सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची प्रेरणादायी भूमिका अधोरेखित केली.
