मराठी नामफलकांबाबतच्या तक्रारीची दखल; संबंधित विभागांना कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मराठी नामफलकांबाबतच्या तक्रारीची दखल; संबंधित विभागांना कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

बेळगाव, प्रतिनिधी : बेळगाव शहर, बेळगाव व खानापूर तालुक्यातील सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नामफलकांवर पूर्वीप्रमाणे मराठी भाषेचा वापर करण्यात यावा तसेच मराठी नामफलक हटविण्यास भाग पाडण्याच्या प्रकारांना आळा घालावा, या मागणीची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. यासंदर्भात संबंधित विभागांना शासनाच्या परिपत्रकानुसार व नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष यांनी ३ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार अर्ज सादर केला होता. या अर्जात बेळगाव शहर, बेळगाव व खानापूर तालुक्यातील सरकारी कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नामफलकांवर पूर्वीप्रमाणे मराठी भाषेचा वापर सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली होती.

तसेच, सरकारी अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच खासगी व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना मराठीतील नामफलक काढण्यास भाग पाडण्याचे प्रकार थांबवावेत, अशीही मागणी अर्जात करण्यात आली होती. कन्नड संघटनांच्या काही कार्यकर्त्यांकडून मराठी नामफलकांना लक्ष्य केल्याचा आरोप करत, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही करण्यात आली होती.

या तक्रारीची दखल घेत अप्पर जिल्हाधिकारी यांनी महानगरपालिका आयुक्त, जिल्हा नगरविकास कक्षाचे प्रकल्प संचालक तसेच कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालकांना पत्र पाठवून संदर्भित विषयाची पाहणी करून शासनाच्या परिपत्रकानुसार व नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

१२ जून २०२६ रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आले असून त्याची प्रत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीलाही पाठविण्यात आली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 3 =

error: Content is protected !!