बेळगाव : चव्हाट गल्ली, बेळगाव येथील सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा क्रमांक ५ मधील विद्यार्थ्यांना बेळगाव रुरल इंडस्ट्रीज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, जिजामाता चौक, फोर्ट रोड यांच्या सौजन्याने गुरुवारी गणवेशाचे वाटप करण्यात आले. शाळेच्या सभागृहात सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या पूजनाने झाली. सोसायटीचे चेअरमन मारुतीराव सदावर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर व्हाईस चेअरमन शिवाजी शहापूरकर, संचालक किसन रेडेकर, मिलिंद पावशे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दीपक किल्लेकर यांनी केले.
यावेळी चेअरमन मारुतीराव सदावर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पालकांना आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना न करण्याचे आवाहन केले. प्रत्येक मूल विशेष असून त्याच्यातील सुप्त गुण ओळखून त्याला आवडत्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन व पाठिंबा द्यावा, असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी आभार मानले.
संचालक कृष्णराव मोदगेकर यांनी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचे आश्वासन दिले. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात आर्थिक अडचणींमुळे अडथळा येऊ नये, यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी विद्यार्थ्यांना “शिकेल तो टिकेल” हा संदेश देत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, असे त्यांनी सांगितले. परीक्षेत ३५ टक्के गुण मिळाले तरी निराश न होता अपयशावर मात करून पुन्हा जिद्दीने अभ्यास करावा, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
चव्हाट गल्लीतील सामाजिक कार्यकर्ते व सोसायटीचे संचालक किसन रेडेकर यांनी विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासासोबत कला व क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःचा विकास करून काळानुरूप बदल स्वीकारला पाहिजे. कोणताही विद्यार्थी मागे राहता कामा नये, असे त्यांनी सांगितले.
गणवेश वाटपामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे मुख्याध्यापक पुंडलिक मुचंडीकर यांच्यासह उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमास चेअरमन मारुतीराव सदावर, व्हाईस चेअरमन शिवाजी शहापूरकर, संचालक कृष्णराव मोदगेकर, किसन रेडेकर, मिलिंद पावशे, रमेश मोदगेकर, मल्लाप्पा चौगुले, रघुनाथ पाटील, जनरल सेक्रेटरी विनायक गोदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, शाळेतील शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पी. एस. माळी सर यांनी केले.
