बेळगाव :
मतदार यादी विशेष पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेदरम्यान नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करून प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत राबवावी, तसेच बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्यावर कोणताही अनावश्यक ताण किंवा दबाव आणू नये, अशी मागणी करणारे निवेदन महापौर आणि उपमहापौर यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एसआयआर प्रक्रियेसंदर्भात नागरिकांमध्ये विविध प्रकारच्या शंका आणि गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने योग्य जनजागृती करून नागरिकांना स्पष्ट माहिती द्यावी. तसेच बीएलओंना Enumeration Form भरण्याच्या कामात आवश्यक सहकार्य, प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
याशिवाय एसआयआर प्रक्रियेमुळे कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी सर्व निर्णय पारदर्शकपणे घेऊन मतदारांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
या निवेदनावर विविध नागरिक व प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या असून, निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
