बेळगाव : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी बेळगाव येथे प्रवेश माहितीपर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता ओरिएंटल इंग्लिश मीडियम स्कूलजवळील श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव) येथे हे शिबिर होणार आहे.
या शिबिरामध्ये एम.ए., एम.कॉम., बी.ए., बी.कॉम., एम.बी.ए. यांसह ऑनलाईन एम.बी.ए., ऑनलाईन एम.कॉम. आणि ऑनलाईन एम.एस्सी. (गणित) या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया, शुल्क, परीक्षा पद्धती आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सीमाभागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
सीमा प्रदेशातील विद्यार्थी, पालक तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित नागरिकांनी या शिबिराला उपस्थित राहून उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती घ्यावी आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
बेळगाव व सीमाभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उच्च शिक्षणाच्या नव्या संधींचा लाभ घ्यावा, असेही आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
