सतीश जारकीहोळी यांचे मेव्हणे तथा अबकारी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घर व कार्यालयांवर ईडीची धाड

सतीश जारकीहोळी यांचे मेव्हणे तथा अबकारी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घर व कार्यालयांवर ईडीची धाड

बेळगाव, दि. २४ : सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे मेव्हणे तथा अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांच्या घरासह विविध ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी पहाटे मोठी धाड टाकली. बेळगाव, बंगळूर, म्हैसूर आणि हासन जिल्ह्यातील एकूण सहा ठिकाणी एकाच वेळी कारवाई करण्यात आली.

गोवा आणि बंगळूर येथील ईडीच्या संयुक्त पथकाने ही कारवाई हाती घेतली असून, बेळगावातील दूरदर्शन केंद्राजवळ असलेल्या मंंजुनाथ यांच्या निवासस्थानी सकाळीच तपास सुरू करण्यात आला. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि तपासाला सुरक्षा मिळावी यासाठी १० हून अधिक निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

मंजुनाथ हे अनेक वर्षांपासून अबकारी विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या निवासस्थानासह संबंधित इतर ठिकाणी मालमत्तेची कागदपत्रे, बँक खात्यांचे तपशील आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असल्याचे समजते.

मंजुनाथ यांनी पदाचा गैरवापर करून बेनामी नावाने कोट्यवधी रुपयांची जमीन, बार अँड रेस्टॉरंट व्यवसाय तसेच इतर मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे. या आरोपांच्या अनुषंगाने ईडीकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

धाड पडलेली ठिकाणे

  • बेळगाव : दूरदर्शन केंद्राजवळील निवासस्थान.
  • बंगळूर : मंजुनाथ यांच्या मालकीचे अपार्टमेंट.
  • म्हैसूर : त्यांच्या महिला मैत्रिणीच्या निवासस्थानी.
  • अरसिकेरे (हासन जिल्हा) : निकटवर्तीयाच्या घरावर.
  • ऐनापूर (अथणी तालुका) : आणखी एका निकटवर्तीयाच्या निवासस्थानी.
  • याशिवाय इतर संबंधित ठिकाणीही तपास सुरू आहे.

आधीच्या कारवाईतून मिळाले धागेदोरे

काही दिवसांपूर्वी ईडीने मंजुनाथ यांचे व्यावसायिक भागीदार आणि मित्रांच्या ठिकाणी धाड टाकली होती. त्या वेळी मिळालेल्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये मंजुनाथ यांचे नाव समोर आल्याचे सांगितले जात आहे. त्याच धाग्यावरून ईडीने आता मंजुनाथ आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाईचा फास आवळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

धाड पडली तेव्हा मंजुनाथ हे बेळगावातील निवासस्थानी उपस्थित नव्हते. सध्या सर्व ठिकाणी कागदपत्रांची तपासणी आणि पुरावे संकलनाचे काम सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 4 =

error: Content is protected !!