सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मराठी युवकांना आवाहन
बेळगाव : प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणारा काळा दिवस यशस्वी करण्यासाठी तसेच सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन कडकडीत बंद पाळण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी शिवसेना युवासेना बेळगावच्या वतीने गोवावेस येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली.
या बैठकीत १ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त आयोजित सायकल फेरीत मराठी युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना आणि मराठी भाषेची ताकद दाखवून देण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करून नागरिकांनी कडकडीत बंद पाळण्यासाठी सहकार्य करावे, तसेच सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन काळा दिवस यशस्वी करावा, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.
या बैठकीला विनायक हुलजी, मल्हारी पावशे, वैभव कामत, मयांक पावशे, सुदर्शन वाटील, अद्वैत चव्हाण-पाटील, सक्षम कंग्राळकर, सुजल काळकुंद्रीकर, स्वयं कपिलेश्वरी, प्रणव पाटील आदी युवासैनिक उपस्थित होते.
