श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे सजीव देखावा स्पर्धा २०२६ जाहीर

श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे सजीव देखावा स्पर्धा २०२६ जाहीर

बेळगाव : शहरातील पारंपरिक व भव्य अशा शिवजयंती उत्सवाला यंदाही उत्साहाचे उधाण येणार असून, यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे सादर करणाऱ्या मंडळांसाठी आनंदाची बातमी आहे. डॉ. रवी पाटील पुरस्कृत श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे “सजीव देखावा स्पर्धा २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगाव शहरात सार्वजनिक शिवजयंतीची परंपरा शंभरी ओलांडून अधिक भव्य होत चालली असून, दरवर्षी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा केला जातो. शहर व परिसरातील विविध मंडळे ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित आकर्षक सजीव देखावे सादर करतात. विशेष म्हणजे या उपक्रमात महिला व बालचमूंचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतो.

या स्पर्धेतील चित्ररथांचे परीक्षण पारंपरिक मार्गावर फिरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून, प्रथम क्रमांकासाठी ₹३१,०००, द्वितीय ₹२५,०००, तृतीय ₹२१,०००, चतुर्थ ₹१५,०००, पाचवा ₹१३,०००, सहावा ₹११,०००, सातवा ₹९,०००, आठवा ₹८,०००, नववा ₹७,००० व दहावा क्रमांकासाठी ₹५,००० अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

याशिवाय वैयक्तिक गटात उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट साहेब अभिनय, आकर्षक महिला व पुरुष अभिनय तसेच उत्कृष्ट बालकलाकार यांसाठी विशेष पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क ₹१०० निश्चित करण्यात आले असून नोंदणीची अंतिम तारीख १८ एप्रिल आहे. इच्छुकांनी ग्रीन्स द युनिक पान शॉप, केळकर बाग, दत्त मंदिरासमोर, बेळगाव येथे नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी सुनील जाधव (९९६४३७०२६१), मेघन तारीहाळकर (७३५३२५३५७३) व प्रसाद पाटील (८०५०००९६६४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिवजयंती उत्सव अधिक भव्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − eleven =

error: Content is protected !!