बेळगाव (प्रतिनिधी):
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील नदिगुडीकेत्रा येथील २६ वर्षीय सत्यव्वा संतोष हेलवी हिचा ‘ऑनर किलिंग’मधून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आंतरजातीय प्रेमसंबंधांना विरोध करत तिच्याच कुटुंबीयांनी विष देऊन हत्या केल्याचा आरोप असून, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह शेजारच्या महाराष्ट्रात गुपचूप जाळण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तिचे काका, भाऊ आणि भाऊजी अशा तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सत्यव्वा ही विवाहित असूनही कृष्णा साहादेव पाटील या वेगळ्या जातीतील तरुणासोबत संबंधात होती. दोघे १७ फेब्रुवारी रोजी पळून जाऊन बेळगावमध्ये राहत होते. दोन्ही कुटुंबीयांनी तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना शोधून काढले होते. दोघेही सज्ञान असल्याने समुपदेशन करून त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले होते.
त्यानंतर सत्यव्वाला कुटुंबीयांनी महाराष्ट्रातील शिरूड व अरग परिसरात नेऊन सुमारे दोन आठवडे संबंध तोडण्यासाठी दबाव टाकला. मात्र तिने नकार दिल्यानंतर २१ मार्च रोजी जबरदस्तीने विष देऊन तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच रात्री अरग येथे मृतदेह जाळण्यात आला. इतकेच नव्हे तर गादी व विषाची बाटलीही जाळून टाकल्याचे समोर आले आहे. मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्यासाठी मृत्यू दाखला मिळवण्याचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र संशय आल्याने अधिकाऱ्यांनी तो नाकारला.
या गुन्ह्याचा उलगडा एका स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे झाला. संशयास्पदरीत्या घाईत अंत्यसंस्कार आणि गादी जाळण्यात आल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी गुप्त तपास सुरू करत कुटुंबीयांची चौकशी केली असता विसंगती आढळून आली. अखेरीस आईच्या कबुलीजबाबातून संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी कृष्णा पाटील यांच्या तक्रारीवरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही घटना बेळगाव जिल्ह्यातील पहिल्या ऑनर किलिंग प्रकरणांपैकी एक मानली जात असून, समाजातील अजूनही जिवंत असलेल्या जातीय मानसिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
#Belgav #BedhadakBelgav
