बेळगाव (शहापूर) : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची व्यापक बैठक मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता साईगणेश सोसायटीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष श्री नेताजी जाधव होते.
यंदाचा पारंपारिक शिवजयंती उत्सव १९ एप्रिल रोजी साजरा होणार असून भव्य चित्ररथ मिरवणूक २१ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्सवाची तयारी, नियोजन आणि विविध विषयांवर सविस्तर विचारविनिमय करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
अध्यक्ष नेताजी जाधव यांनी सांगितले की, बेळगावच्या पारंपारिक शिवजयंतीला तब्बल १०७ वर्षांची गौरवशाली परंपरा असून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतून हजारो शिवभक्त या सोहळ्यासाठी येतात. त्यामुळे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि भव्यदिव्य स्वरूपात साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करताना सांगितले की, १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी उद्यान, शहापूर येथे मध्यवर्ती शिवजयंती मंडळ आणि शहापूर महामंडळाच्या वतीने संयुक्त पूजन होणार आहे. तसेच २१ एप्रिल रोजी सायंकाळी बॅ. नाथ पै चौक येथे पहिल्या चित्ररथाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात येईल. शहापूर, अनगोळ आणि वडगाव भागातून येणाऱ्या चित्ररथांचे स्वागतही महामंडळाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्सव मंडळांना कोणतीही अडचण आल्यास महामंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत प्रशांत भातकांडे, श्रीकांत कदम, महादेव पाटील, पी.जी. घाडी, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू बिर्जे, रणजीत हावळणाचे आदींनी आपले विचार मांडले.
दरम्यान, कै. दीपक दळवी यांच्या निधनानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री प्रकाश मरगाळे तसेच मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अंकुश केसरकर यांचा शहापूर महामंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रकाश मरगळे यांनी आपल्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. सीमाप्रश्नासंदर्भातील घडामोडींवर लक्ष केंद्रित केले असून शिवजयंतीनंतर पुढील लढ्याची दिशा ठरवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. अंकुश केसरकर यांनीही तरुण कार्यकर्त्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, १०७ वर्षांची परंपरा लाभलेली शिवजयंती अधिक भव्य करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
बैठकीला संजय शिंदे, राजू बिर्जे, अशोक चिंडक, महादेव पाटील, पी.जी. घाडी, हिरालाल चव्हाण, श्रीकांत प्रभू, श्रीधर जाधव, सचिन केळवेकर, रणजीत हावळणाचे, अभिजीत मजुकर, सुरज चव्हाण, मंगेश नागोजीचे, राजाराम सूर्यवंशी, अनिल आंबरोळे, बाबू कोले, शशिकांत सडेकर, एस.आर. चौगुले, शिवकुमार मनवाडकर, जोतिबा मासेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत भातकांडे यांनी केले.
