घरफोडीतील सराईत आरोपी जेरबंद; १७.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन गुन्ह्यांची उकल

घरफोडीतील सराईत आरोपी जेरबंद; १७.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन गुन्ह्यांची उकल

बेळगाव, दि. ५ जून : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांतील एका सराईत आरोपीला अटक करून सुमारे १७ लाख ९० हजार रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील तीन महत्त्वाच्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

भवाणी नगर येथील रहिवासी रोहन राजेश जाधव यांच्या घरात ३१ डिसेंबरच्या रात्री घरफोडी करून चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी त्यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमणीगौडा यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय संतोष दळवाई, पीएसआय लक्कप्पा जोडट्टी तसेच कर्मचाऱ्यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. गुप्त माहितीच्या आधारे या पथकाने निलेश भरमा सुतार (वय ४१, रा. संभाजी गल्ली, मंडोळी, मूळ रा. भोई गल्ली, बेळगाव) याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.

चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने भवाणीनगर येथील रोहन जाधव यांच्या घरात, मच्छे येथील गंगा गल्लीतील लक्ष्मी रुद्रप्पा देवलापूर यांच्या घरात तसेच मच्छे येथील गणेश ज्वेलर्स या सराफा दुकानात चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपीकडून पोलिसांनी ७ लाख रुपये किमतीचे ९५ ग्रॅम सोने आणि १० लाख ९० हजार रुपये किमतीची १४ किलो १७८ ग्रॅम चांदी असा एकूण १७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमणीगौडा, पीएसआय संतोष दळवाई, पीएसआय लक्कप्पा जोडट्टी, कर्मचारी सतीश नायकवाड, श्रीकांत उप्पार, बाळेश पडनाड, आनंद कोटगी, शिवानंद वर्चगल्ल, अमित रूपनवर, शिवकुमार कांबळे तसेच तांत्रिक विभागातील रमेश अक्की, महादेव काशिद आणि दीपक दोडगोणी यांचे पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three + 14 =

error: Content is protected !!