बेळगावातील मराठी विद्यानिकेतन शाळेच्या अटल टिंकरिंग लॅबमध्ये मंगळवार, 12 मे 2026 रोजी विज्ञान शिबिराचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विविध शाळांमधील एकूण 34 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी विद्यानिकेतन शाळेतील एसएसएलसी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग सादर करून शिबिराचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रयोगांनी उपस्थितांची उत्सुकता वाढवली.
यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष सुरेश पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार, शिक्षण संयोजिका नीला आपटे, गौरी ओऊळकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
12 मे ते 23 मे दरम्यान चालणाऱ्या या विज्ञान शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवले जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, नवोन्मेषी विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
