बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाइतकेच क्रीडेलाही महत्त्व आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबरच शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळाची आवड जोपासावी, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे प्रसाद तेंडुलकर यांनी केले.
आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयात गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित जिमखाना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लता कित्तूर होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून धनश्री आजगावकर उपस्थित होत्या.
यावेळी धनश्री आजगावकर यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या वाढत्या वापराबाबत जागरूक करताना, “मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांचे शरीर सुदृढ व तंदुरुस्त बनते. त्यामुळे मोबाईल बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ मैदानावर खेळाला दिला पाहिजे,” असे सांगितले. विद्यार्थ्यांनी क्रीडेला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. यावेळी प्राचार्या तृप्ती शिंदे, प्रा. आनंद रत्नाप्पागोळ आणि प्रा. महादेव खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांची ओळख सोनाल बिर्जे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चार्मिन फर्नांडिस व प्रा. रिचेल साळवी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहपूर्ण आणि क्रीडामय वातावरण लाभले.
— बेधडक बेळगाव वृत्तसेवा
