मराठीच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरू; शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा

मराठीच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरू; शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा

बेळगाव : सीमाप्रश्नाचा अंतिम निकाल लागेपर्यंत मराठी भाषिकांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारण्याचा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. मराठी फलकांच्या प्रश्नावर मोठा मोर्चा काढण्यासह धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

रविवारी पार पडलेल्या शहर म. ए. समितीच्या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, रणजीत चव्हाण-पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

बैठकीत मराठी भाषिकांवरील अन्याय, सीमाप्रश्नाची सद्यस्थिती तसेच प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने देऊनही मराठी भाषिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

१ जून रोजी हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करून आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याबरोबरच महानगरपालिकेसमोरही आंदोलन करण्याची मागणी काही कार्यकर्त्यांनी केली. तसेच महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नावर तातडीने उच्चस्तरीय बैठक घेऊन ठोस भूमिका मांडावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

यावेळी बेळगाव महापालिकेत मराठी भाषेसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या समितीच्या तिन्ही नगरसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला. मराठीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

बैठकीत नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, अंकुश केसरकर, मनोहर हलगेकर, सागर पाटील, राजू बिरजे, श्रीधर खन्नुकर, ॲड. अमर येळ्ळूकर, मदन बामणे, श्रीकांत कदम, अनिल आंबरोळे, राजू पाटील, उमेश पाटील, राजू मरवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, मध्यवर्ती समितीच्या आगामी बैठकीत आंदोलनाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असून, धरणे आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी गावागावांतून सहकार्य गोळा करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 + 15 =

error: Content is protected !!