अधिकस्य अधिक फलंम्; रयत गल्लीत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तिमय परंपरा

अधिकस्य अधिक फलंम्; रयत गल्लीत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तिमय परंपरा

वडगाव (प्रतिनिधी): दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासाचे औचित्य साधून माधवपूर-वडगाव येथील रयत गल्लीमध्ये ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात येते. “अधिकस्य अधिक फलंम्” या उक्तीप्रमाणे अधिकमासात अधिक पुण्यप्राप्ती व्हावी तसेच शेतीच्या कामासोबत भक्तीचा संगम घडावा, या उद्देशाने हा तीन दिवसीय धार्मिक सोहळा अनेक वर्षांपासून आयोजित केला जात आहे.

या पारायण सोहळ्यात पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे वाचन, वारकरी संप्रदायातील भाविकांचे भजन, महिला भजनी मंडळांचा सहभाग अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय बनते. सायंकाळी प्रवचन तर रात्री नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा आयोजित केली जाते. यानंतर देणगीदारांच्या सहकार्याने प्रसाद सेवेचे आयोजन केले जाते.

रयत गल्लीमध्ये शेतकरी वर्गाची संख्या मोठी असल्याने खरिप हंगाम जवळ आलेला असतानाही शेतकरी बांधव आपल्या शेतीची बहुतांश कामे पूर्ण करून केवळ पेरणीची कामे शिल्लक ठेवतात. पारायण सोहळा संपल्यानंतरच पेरणीला सुरुवात करण्याची परंपरा येथे जपली जाते. गुरुवार ते रविवार या कालावधीत चालणाऱ्या या सोहळ्याला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गल्लीतील लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभाग घेतात. स्वयंपाकाची व्यवस्था, प्रसाद तयारी, भांडी स्वच्छता, भाविकांची सेवा आदी सर्व कामे स्वयंसेवी भावनेतून केली जातात. महिला, युवक, वारकरी आणि बालगोपाळ भाविकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात.

देणगीदारांचा सन्मान, कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी गल्लीतील ज्येष्ठ नागरिक व वारकरी मंडळी सांभाळतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पारायण सोहळा दरवेळी शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीरित्या पार पडत असून परिसरातील धार्मिक आणि सामाजिक एकतेचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − fifteen =

error: Content is protected !!