अमृतमहोत्सवी वाढदिवशी रवींद्र भोसले यांचा देहदानाचा संकल्प

अमृतमहोत्सवी वाढदिवशी रवींद्र भोसले यांचा देहदानाचा संकल्प

जायंट्स आय फाउंडेशनतर्फे प्रमाणपत्र देऊन गौरव

बेळगाव : वाढदिवस म्हटले की आनंदोत्सव, शुभेच्छा आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, आपल्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून मठ गल्ली, होसूर येथील श्री. रवींद्र मारुतीराव भोसले यांनी देहदानाचा संकल्प करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या सामाजिक आणि मानवतावादी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मृत्यूनंतरही आपल्या देहाचा उपयोग वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी व्हावा, या उदात्त भावनेतून भोसले यांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासंदर्भात त्यांनी जायंट्स आय फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष मदन बामणे यांच्याशी संपर्क साधला होता.

यानंतर मदन बामणे यांनी भोसले यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देहदान म्हणजे काय, त्याची प्रक्रिया कशी असते आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधनामध्ये देहदानाचे किती महत्त्व आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. कुटुंबीयांची सहमती आणि रवींद्र भोसले यांची ठाम इच्छा यानुसार त्यांनी जायंट्स आय फाउंडेशनकडे रीतसर देहदान संकल्प अर्ज भरून दिला.

न्यू उदय भुवन येथे आयोजित कौटुंबिक सोहळ्यात जायंट्स आय फाउंडेशनचे अध्यक्ष मदन बामणे, माजी अध्यक्ष शिवराज पाटील, संचालक अशोक हलगेकर आणि प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते रवींद्र भोसले यांना देहदान संकल्प प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याला शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी मदन बामणे यांनी उपस्थितांना देहदान, नेत्रदान आणि त्वचादान यांचे महत्त्व समजावून सांगितले. मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करता येतो, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावता येतो आणि अनेक गरजू रुग्णांना मदत करता येते, असा संदेश त्यांनी दिला. तसेच देहदान व नेत्रदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

अमृतमहोत्सवी वाढदिवशी देहदानाचा संकल्प करून रवींद्र भोसले यांनी वाढदिवस साजरा करण्याची एक वेगळी आणि समाजोपयोगी संकल्पना सर्वांसमोर ठेवली आहे. त्यांचा हा निर्णय इतरांनाही देहदानासाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे.

यावेळी उपस्थितांनी रवींद्र भोसले यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी व आनंदी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. जायंट्स आय फाउंडेशनच्या वतीनेही त्यांच्या या महान संकल्पाचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + 14 =

error: Content is protected !!