बेळगाव, दि. २७ : मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (द मराठा एलआयआरसी), बेळगाव येथे रक्षाबंधनाचा सण पारंपरिक उत्साह आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. समाज आणि सैनिक यांच्यातील विश्वास, स्नेह व परस्पर आदराचे नाते अधिक दृढ करणारा हा सोहळा ठरला.
या कार्यक्रमास मराठा एलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय (एसएम**, व्हीएसएम), फॅमिली वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा श्रीमती वेदा उपाध्याय, सर्व अधिकारी, त्यांच्या पत्नी व कुटुंबीय उपस्थित होते.

रक्षाबंधन सोहळ्यात बेळगाव परिसरातील १० हून अधिक शाळा व शैक्षणिक संस्थांमधील २३८ विद्यार्थिनी, महिला शिक्षिका तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थिनींनी अधिकारी, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स (जेसीओ), जवान आणि अग्निवीर यांच्या मनगटावर राखी बांधून समाज आणि सैनिक यांच्यातील पवित्र नात्याला उजाळा दिला.
सैनिकांनीही अभिमानाने आणि नम्रतेने राखी स्वीकारत देश व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहण्याची भावना व्यक्त केली. विद्यार्थिनींसाठी हा अनुभव संस्मरणीय ठरला. भारतीय सैन्याचे शौर्य, त्याग, सेवा आणि देशभक्तीची मूल्ये प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी त्यांना मिळाली.
भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या सोहळ्याने समाज आणि सैनिक यांच्यातील नाते अधिक बळकट केले. रक्षाबंधनाचा हा उत्सव केवळ राखी बांधण्यापुरता मर्यादित न राहता विश्वास, एकता आणि राष्ट्राप्रती सामूहिक जबाबदारीची भावना दृढ करणारा ठरला.
