बेळगाव, दि. २८ : खानापूर तालुक्यातील चर्चेतील POCSO प्रकरणात सुमारे ३ महिने २६ दिवस न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाला माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष POCSO न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने हा आदेश २७ ऑगस्ट २०२६ रोजी दिला.
प्रकरणातील माहितीनुसार, भिन्न जातीतील एक तरुण आणि अल्पवयीन मुलगी प्रेमसंबंधात होते. त्यानंतर दोघांनी घरातून बाहेर पडून सुमारे २० दिवस विविध ठिकाणी वास्तव्य केले. या काळात त्यांनी बेळगाव, पंढरपूर, कोल्हापूर आणि पुणे येथे प्रवास केल्याचे तपासात समोर आले आहे.
यानंतर दोघेही घरी परतले. मात्र संबंधित मुलगी १६ वर्षांची असून नुकतीच एसएसएलसी उत्तीर्ण झालेली असल्याने तिच्या पालकांनी या संबंधास विरोध दर्शवत खानापूर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११२/२०२६ नोंद करण्यात आला. पुढे या प्रकरणाची विशेष POCSO प्रकरण क्रमांक ४१५/२०२६ अशी नोंद झाली.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ९६ व ६४(२)(m) तसेच POCSO कायदा, २०१२ अंतर्गत कलम ४ व ६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपी तरुण मागील तीन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असल्याने त्याने नियमित जामिनासाठी विशेष POCSO न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सिद्धार्थराजे सावंत यांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद करत प्रकरणाची पार्श्वभूमी, दोघांमधील संबंध, एकत्र घालवलेला कालावधी आणि इतर महत्त्वाच्या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.
प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेत न्यायालयाने आरोपीस नियमित जामीन मंजूर केला.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांवर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नसून आरोपीचा दोष किंवा निर्दोषत्वाबाबतचा अंतिम निर्णय न्यायालयाकडून पुढील सुनावणीनंतर होणार आहे.
