स्वरूपायनमधून प्रा. स्वरूपा इनामदार यांनी उलगडले स्त्रीचे विविध पैलू‘कवी समजून घेताना’ उपक्रमाचे सातवे पुष्प उत्साहात संपन्न

स्वरूपायनमधून प्रा. स्वरूपा इनामदार यांनी उलगडले स्त्रीचे विविध पैलू‘कवी समजून घेताना’ उपक्रमाचे सातवे पुष्प उत्साहात संपन्न

बेळगाव, दि. १३ जून : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने आयोजित ‘कवी समजून घेताना’ या उपक्रमाच्या सातव्या पुष्पात ज्येष्ठ कवयित्री प्रा. स्वरूपा इनामदार यांनी आपल्या कवितांमधून स्त्रीजीवनाचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडून दाखविले. कोरे गल्ली येथील सरस्वती वाचनालयात झालेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी होते. प्रारंभी उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी प्रस्ताविकातून उपक्रमाची माहिती देत प्रा. इनामदार यांचा परिचय करून दिला.

‘स्वरूपायन’ या विशेष सादरीकरणातून प्रा. इनामदार यांनी आपल्या कवितांचे रसग्रहण घडवून आणत काव्यनिर्मितीमागील अनुभव, विचारविश्व आणि सामाजिक जाणिवांचा वेध घेतला. ‘सहवास’ आणि ‘कविता’ या रचनांमधून कविता जन्माला येण्याची प्रक्रिया त्यांनी शब्दबद्ध केली. ‘हरित क्रांतीच्या जोगवा’ या कवितेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना ‘मी एक स्त्री’ आणि ‘युगा युगातली स्त्री’ या कवितांमधून स्त्रीच्या संघर्षमय प्रवासाचे प्रभावी चित्र उभे केले.

‘आम्ही मानकरी’ व ‘हाच तर स्त्री जन्म’ या कवितांतून स्त्रीशक्तीचे सामर्थ्य अधोरेखित करण्यात आले, तर ‘भूक’ या वास्तवदर्शी कवितेतून दारिद्र्याने होरपळलेल्या मजूर स्त्रीची व्यथा हृदयस्पर्शीपणे मांडण्यात आली. ‘नव विचारांसाठी’, ‘कबीर तुका ज्ञाना गवसला’, ‘दोष ना कुणाचा’, ‘फिनिक्स’, ‘मुलीचा जन्म’, ‘खरं पवित्र’, ‘गबाळी’ आणि ‘स्त्री’ या कवितांमधून सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक आशय प्रगल्भतेने व्यक्त झाला.

यानंतर झालेल्या मुक्त काव्यवाचन सत्रात अशोक सुतार, परशुराम खेमणे, नेहा जोशी, स्मिता किल्लेकार, गुरुनाथ किरमटे, मधु पाटील, हर्षदा भातकांडे, शुभदा खानोलकर, गौरी धामणेकर, महादेव खोत, निरंजन सरदेसाई, अस्मिता अळतेकर आणि बसवंत शहापूरकर यांनी आपल्या कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमादरम्यान शब्दगंध कवी मंडळाच्या सदस्या अस्मिता अळतेकर आणि स्मिता किल्लेकार यांची मंथनच्या कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

स्त्रीजीवन, सामाजिक भान, पर्यावरण संवर्धन, मानवी मूल्ये आणि नव्या विचारांचा संगम घडवून आणणारा हा काव्यमय कार्यक्रम साहित्यरसिकांच्या मनावर कायमची छाप उमटवून गेला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी शब्दगंध कवी मंडळ संघाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कवी गुरुनाथ किरमटे यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + seven =

error: Content is protected !!