शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी रविवार पेठ आणि कलमठ रस्त्यावर एकमार्गी (वन-वे) वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. या भागात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर दुकाने असून वाहनांची व नागरिकांची मोठी वर्दळ असल्यामुळे वारंवार ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होत होती.
स्थानिक नागरिकांच्या अभिप्रायानुसार तब्बल 86 टक्के लोकांनी एकमार्गी वाहतुकीला समर्थन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन नियमानुसार –
• पिंपळ कट्टा ते कर्नाटक चौक मार्गे नरगुंदकर भावे चौकाकडे जाणारा रविवार पेठ रस्ता पूर्वेकडून पश्चिमेकडे एकमार्गी करण्यात आला आहे.
• नरगुंदकर भावे चौक ते पिंपळ कट्टा दरम्यान कलमठ रस्ता पश्चिमेकडून पूर्वेकडे एकमार्गी करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
