बेळगाव: शहरातील अनगोळ रोड परिसरातील एका व्यावसायिक खाद्य आस्थापनावर मराठी भाषेतील फलक लावल्याच्या कारणावरून एका सोशल मीडिया पेजवर भाषिक द्वेष पसरविण्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित आस्थापनाने कायद्याच्या चौकटीत राहून मोठ्या जागेत कन्नड फलकासोबत सुमारे 40 टक्के भागात मराठी भाषेतही फलक लावला आहे.
मात्र, एका कथित कन्नड भाषिक सोशल मीडिया खात्यावरून फक्त मराठी मजकूर असलेल्या फलकाचे फोटो प्रसारित करून दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सातत्याने “ते” पेज शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे.
स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, अशा प्रकारे सातत्याने भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या त्या पेजवर प्रशासनाकडून ठोस कारवाई का केली जात नाही? विशेषतः बाहेरून येऊन शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, मराठी फलकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीनेही अशा घटनांवेळी अधिक सक्रिय होऊन कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच शहरातील शांतता आणि सौहार्द कायम राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
