कपिलेश्वर तलावात विसर्जनासाठी पाणीच नाही; भाविकांचा संताप, महापालिकेवर निष्काळजीपणाचा आरोप

कपिलेश्वर तलावात विसर्जनासाठी पाणीच नाही; भाविकांचा संताप, महापालिकेवर निष्काळजीपणाचा आरोप

बेळगाव : गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर कपिलेश्वर तलावात गोकुळाच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था नसल्याने भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. तलावात अवघे ७ ते ८ इंच पाणी शिल्लक असल्याने मूर्तींचे विसर्जन अत्यंत अडचणीत करावे लागले. या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

गोकुळाष्टमीच्या पूजेनंतर दुसऱ्या दिवशी गोकुळाच्या मूर्तींचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. बेळगाव शहरात नदी नसल्यामुळे दरवर्षी कपिलेश्वर तलावात मोठ्या संख्येने भाविक मूर्ती विसर्जनासाठी येतात. यंदा मात्र तलावात एक फुटापेक्षाही कमी पाणी असल्याचे निदर्शनास आल्याने भाविकांना नाईलाजाने अल्प पाण्यातच विसर्जन करावे लागले.

या घटनेमुळे उपस्थित नागरिक आणि भाविकांनी महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. गोकुळ विसर्जनासारख्या धार्मिक कार्यक्रमासाठी दरवर्षी हजारो भाविक येत असताना तलावात पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, ही माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर, रामराज दरवंदकर तसेच माजी नगरसेवक राजू बिरजे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणत्याही अधिकाऱ्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.

गोकुळाष्टमीसारख्या पारंपरिक धार्मिक उत्सवासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले अपयश हे चिंताजनक असून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने योग्य नियोजन करावे, तसेच धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − fourteen =

error: Content is protected !!