डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्स शेड रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी

डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्स शेड रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी

बेळगाव : डेक्कन हॉस्पिटलसमोरील बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील न्यू गुड्स शेड रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती आणि जलनिस्सारण व्यवस्था तातडीने उभारण्यात यावी, अशी मागणी समाजसेवक गणेश दड्डीकर यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दड्डीकर यांनी सांगितले की, यापूर्वीही या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

एल अँड टी कंपनीच्या कामानंतर हा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून, दररोज हजारो नागरिक, रुग्ण, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात, पाठदुखी आणि इतर आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांच्या गणवेशावर चिखल उडत असून वाहनचालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.

बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलावरील पावसाचे पाणी थेट या रस्त्यावर येत असल्यामुळे दरवर्षी रस्त्याचे अधिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना योग्य जलनिस्सारण गटारी बांधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पावसाळा लक्षात घेऊन कायमस्वरूपी काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्टोन डस्ट किंवा वेट मिक्स टाकून रोड रोलरद्वारे रस्ता समतल करावा. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाळ्यातही कायमस्वरूपी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः या रस्त्याची पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती व जलनिस्सारणाची कामे तातडीने हाती घ्यावीत तसेच या निवेदनाची पोहोच देऊन कामाच्या संभाव्य कालमर्यादेबाबत लेखी माहिती द्यावी, अशी विनंती गणेश दड्डीकर यांनी केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − 16 =

error: Content is protected !!