धाराशिव, दि. 30 मे : अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित 32 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना, वेदना आणि महाराष्ट्राशी असलेले भावनिक नाते प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘माय’ या कवितेने रसिकांची मने जिंकली. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष तथा सीमाकवी रवींद्र पाटील (कुद्रेमनी) यांनी केलेल्या या सादरीकरणाला उपस्थित साहित्यप्रेमींकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
धाराशिव येथील लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरीत 29 व 30 मे रोजी पार पडलेल्या या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. नंदकुमार राऊत यांनी भूषविले. आमदार कैलास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरद गोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभलेल्या या संमेलनात देशभरातील सुमारे 200 कवी, साहित्यिक आणि नवोदित लेखक सहभागी झाले होते.
संमेलनातील विविध काव्य सत्रांमध्ये अनेक विषयांवरील कविता सादर झाल्या. मात्र सीमाभागातील मराठी बांधवांच्या भावना व्यक्त करणाऱ्या ‘माय’ या कवितेने विशेष लक्ष वेधून घेतले. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी आणि बिदर येथील मराठी भाषिकांच्या संघर्षमय जीवनाचे आणि महाराष्ट्राविषयीच्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचे हृदयस्पर्शी चित्रण कवितेतून करण्यात आले.
“महाराष्ट्र माझी माय, लेकरू बेळगाव रे… ताटातून दूर गेलं, तरी नातं जिव्हाळ्याचं रे…” या ओळींनी सभागृहात भावनिक वातावरण निर्माण केले. तर “माय तुझ्या कुशीत यावं, हीच लेकराची आस…” या ओळींनी सीमाभागातील मराठी माणसांची घुसमट आणि मायमहाराष्ट्रात सामावून जाण्याची आस जिवंत केली.
सीमाभागातील मराठी अस्मितेचा प्रश्न मांडताना “बेळगावाची हाक ऐक, कारवाराचं दुःख बघ…” या ओळींना उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळाला. कविता सादर होत असताना अनेक श्रोते भावुक झाले असून सभागृहात मराठी अस्मितेचा स्वर घुमला.
संमेलनाध्यक्ष डॉ. नंदकुमार राऊत, आमदार कैलास पाटील, डॉ. शरद गोरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही कवितेचे कौतुक केले. सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना आणि महाराष्ट्राविषयीची अखंड निष्ठा प्रभावीपणे व्यक्त करणारी ‘माय’ ही कविता संमेलनातील सर्वाधिक चर्चेची आणि संस्मरणीय ठरली. तिच्या माध्यमातून सीमाप्रश्नाविषयी नव्याने जागृती निर्माण झाली असून रसिकांच्या मनावर या सादरीकरणाची कायमची छाप उमटली.
